दै.अधिकारनामा / गणेश कदम
२०२० ते २०२१ या कालावधीत जिल्हास्तरीय शेळी-मेंढी वाटप योजनेत नाव असूनही लाभ न मिळाल्याचा गंभीर आरोप अंजनी (ता. बिलोली) येथील कमलबाई पिराजी गावंडे यांनी केला आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे निवेदन सादर करून आपल्याला योजनेचा लाभ का मिळाला नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेळी-मेंढी वाटप योजनेत प्रत्यक्ष लाभार्थी यादीत आपले नाव असूनही, काही अधिकाऱ्यांना पैसे न दिल्याने लाभ रोखल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शंकर उदगारे यांनी ५००० रुपये लाच मागितल्याचा गंभीर आरोप कमलबाई गावंडे यांनी केला आहे. पैसे न दिल्यामुळे लाभ नाकारण्यात आला, तर दुसऱ्या लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना लाभ देण्यात आला आहे परंतु पशुसंवर्धन विभागामार्फत लाभ मिळाला आहे असे गावात कोणाला सांगू नका असे अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना सांगितले
कमलबाई गावंडे यांनी हा प्रकार अत्यंत अन्यायकारक असल्याचे नमूद करत १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी योजनेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि आपल्याला तातडीने लाभ देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची दखल प्रशासन घेते का, आणि संबंधितांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, योजनेतील पारदर्शकता आणि लाभार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा तपासण्याची गरज आहे तसेच वरिष्ठ अधिकारी संबंधित पशुसंवर्धन अधिकारी उदगीरे यांच्यावर काय कारवाई करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
